TEAM IBN 7 : ( प्रतिनिधी दिलीप कांबळे ) : कवठे महांकाळ (जि. सांगली) येथे डॉक्टरांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून लुबाडणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात सांगली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांना लक्ष्य करून बनावट आयकर अधिकारी म्हणून धमकावत मोठ्या रकमेची लुबाडणूक करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणी सांगली पोलिसांनी धडक मोहीम राबवली.
अटक आरोपींमध्ये दीक्षा भोसले (रा. पिंपरी-चिंचवड, पुणे), पार्थ मोहिते (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) व साई मोहिते (रा. प्रगती नगर, पाचगाव, करवीर, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. तर महेश शिंदे (रा. जयसिंगपूर, सध्या घाटकोपर, मुंबई), शकील पटेल (रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) व आदित्य मोरे (रा. टाकळी, कोल्हापूर) हे आरोपी फरार आहेत.

ही कारवाई जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जोतिराम पाटील, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, दत्तात्रय कोळेकर, नितीन सावंत, रुपाली बोबडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी संदीप नलावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिसांनी सहभाग घेतला.
विशेष खबरीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून यात रात्रंदिवस केलेल्या तपासामुळे पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणातील उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
या कारवाईमुळे बनावट अधिकारी बनून लुबाडणूक करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.

